सर्व लोकांसाठी प्रार्थना
पौल सर्वप्रथम सांगतो की राजांसह सर्वांसाठी प्रार्थना केली जावी, कारण सर्व लोकांचे तारण व्हावे अशी आमच्या पित्याची इच्छा आहे, आणि ख्रिस्त येशू या एकाच मध्यस्थाने सर्वांसाठी स्वतःला दिले. मग पुरुषांनी राग न धरता प्रार्थना करावी, आणि स्त्रियांनी मर्यादशील पोशाख करावा, शांतपणे शिकावे, व शिकवू नये.
2 1तेव्हा सर्वांत प्रथम, मी अशी विनंती करतो की, सर्व लोकांसाठी विनवण्या, प्रार्थना, मध्यस्थी व उपकारस्तुती करण्यात याव्यात, 2राजांसाठी व अधिकारावर असलेल्या सर्वांसाठी, यासाठी की आपण पूर्ण भक्तिभावाने व गांभीर्याने शांत व स्वस्थ जीवन जगावे. 3हे चांगले असून आमचा पिता, आमचा तारणारा, याला संतोष देणारे आहे, 4सर्व लोकांचे तारण व्हावे आणि त्यांनी सत्याचे ज्ञान प्राप्त करावे अशी त्याची इच्छा आहे. 5कारण एकच पिता आहे, आणि पिता व मानवजात यांच्यामध्ये एकच मध्यस्थ आहे, तो म्हणजे मनुष्य ख्रिस्त येशू, 6ज्याने सर्वांसाठी खंडणी म्हणून स्वतःला दिले—ही साक्ष योग्य वेळी देण्यात आली. 7याकरिता मला उपदेशक व प्रेषित नेमण्यात आले—मी खरे सांगतो, खोटे बोलत नाही—विश्वासात व सत्यात राष्ट्रांचा शिक्षक. 8माझी इच्छा आहे की प्रत्येक ठिकाणी पुरुषांनी राग व वादविवाद न करता पवित्र हात वर करून प्रार्थना करावी.
9त्याचप्रमाणे, स्त्रियांनी विनयशीलतेने व संयमाने योग्य पेहराव करावा; केसांची गुंफण, सोने, मोती किंवा मौल्यवान वस्त्रे यांनी नव्हे, 10तर आमच्या पित्याविषयी भक्तिभाव बाळगणाऱ्या स्त्रियांना शोभेल अशा सत्कर्मांनी त्यांनी स्वतःला शोभवावे. 11स्त्रीने पूर्ण अधीनतेने, शांतपणे शिकावे. 12स्त्रीने शिकवावे किंवा पुरुषावर अधिकार चालवावा याला मी परवानगी देत नाही; उलट, तिने शांत राहावे. 13कारण प्रथम आदाम निर्माण झाला, मग हव्वा. 14आणि आदाम फसवला गेला नाही, तर स्त्री फसवली गेली व अपराधी ठरली. 15तरी ती बाळंतपणाद्वारे तारली जाईल, जर त्या विश्वासात, प्रीतीत, पवित्रतेत संयमाने राहिल्या तर. a a v15 'ती' वरून 'त्या' असे सर्वनाम बदलते—मूळ मजकुरातल्याप्रमाणे—बहुधा या सद्गुणांत टिकून राहणाऱ्या स्त्रियांना सर्वसाधारणपणे उद्देशून.