सर्व काही नवे
जुनी व्यवस्था नाहीशी झाली आहे आणि आमचा पिता माणसांमध्ये राहायला येतो. तो स्वतः त्यांचा पिता आहे आणि त्यांचे चेहरे पुसून कोरडे करतो. नगरी खाली उतरते, मोजलेली, रत्नजडित आणि प्रत्येक बाजूला वेशी असलेली. तिच्यात मंदिर नाही, कारण तो आणि कोकरा हेच तिचे मंदिर आहेत. वेशी बंद कराव्या लागतील अशी रात्रही तिथे नाही.
21 1मग मी एक नवे आकाश व नवी पृथ्वी पाहिली, कारण पहिले आकाश व पहिली पृथ्वी नाहीशी झाली होती, आणि समुद्रही राहिला नव्हता. 2मी पवित्र नगरी, नवे यरुशलेम, स्वर्गातून, आमच्या पित्याकडून खाली उतरताना पाहिली; ती आपल्या पतीसाठी शृंगारलेल्या वधूसारखी सज्ज होती.
3मग मी राजासनाकडून एक मोठी वाणी ऐकली, ती म्हणाली, “पाहा, आमच्या पित्याचे वस्तिस्थान मानवजातीबरोबर आहे. तो त्यांच्याबरोबर राहील; ते त्याचे लोक होतील, आणि तो स्वतः, त्यांचा पिता, त्यांच्याबरोबर राहील.
4आमचा पिता त्यांच्या डोळ्यांतील प्रत्येक अश्रू पुसून टाकील, आणि मरण पुन्हा राहणार नाही, शोकही राहणार नाही, रडणेही नाही, दुःखही यापुढे राहणार नाही, कारण पूर्वीच्या गोष्टी नाहीशा झाल्या आहेत.”
5राजासनावर बसलेला म्हणाला, “पाहा, मी सर्व काही नवे करीत आहे.” तो पुढे म्हणाला, “हे लिहून ठेव: ही वचने विश्वसनीय व खरी आहेत.” 6त्याने मला सांगितले: “झाले. मी अल्फा व ओमेगा आहे, आरंभ व अंत आहे. तहानलेल्याला मी जीवनाच्या पाण्याच्या झऱ्यातून फुकट देईन. 7जो विजय मिळवितो त्याला या गोष्टींचे वतन मिळेल, आणि मी त्याचा पिता होईन, व तो माझा पुत्र होईल. 8परंतु भित्रे, अविश्वासू, अमंगळ, खुनी, व्यभिचारी, चेटूक करणारे, मूर्तिपूजक, आणि सर्व लबाड—यांचा वाटा अग्नी व गंधकाने जळणाऱ्या सरोवरात आहे; हे दुसरे मरण होय.”
9सात शेवटल्या पीडांनी भरलेल्या सात वाट्या धरणाऱ्या सात देवदूतांपैकी एक आला आणि मला म्हणाला, “ये, मी तुला वधू, येशू कोकऱ्याची पत्नी दाखवितो.” 10त्याने मला आत्म्यात एका मोठ्या, उंच पर्वतावर नेले, आणि पवित्र नगरी यरुशलेम स्वर्गातून, आमच्या पित्याकडून खाली उतरताना मला दाखविली, 11तिच्यात आमच्या पित्याचे तेज प्रकट होत होते, अत्यंत दुर्मिळ रत्नासारखे, स्फटिकासारख्या स्वच्छ यास्फे रत्नासारखे तेजस्वी. 12तिला एक मोठी, उंच तटबंदी होती, तिला बारा वेशी होत्या, त्यांवर बारा देवदूत नेमलेले होते, आणि तेथे इस्राएलाच्या पुत्रांच्या बारा वंशांची नावे लिहिलेली होती, 13पूर्वेस तीन वेशी, उत्तरेस तीन वेशी, दक्षिणेस तीन वेशी, पश्चिमेस तीन वेशी. 14नगरीच्या तटबंदीला बारा पाये होते, आणि त्यांवर येशू कोकऱ्याच्या बारा प्रेषितांची बारा नावे होती.
15माझ्याशी बोलणाऱ्याजवळ नगरी, तिच्या वेशी व तिच्या तटबंदी मोजण्यासाठी एक सोन्याची मापकाठी होती. 16नगरी चौरस आहे, तिची लांबी तिच्या रुंदीइतकी आहे. त्याने आपल्या काठीने ती मोजली: सुमारे चौदाशे मैल—लांबी, रुंदी व उंची समान. 17त्याने तिची तटबंदी मोजली—सुमारे दोनशे सोळा फूट, मानवी मापाने, जे देवदूताचेही आहे. 18तटबंदी यास्फे रत्नाची बांधलेली होती, तर नगरी काचेसारख्या स्वच्छ शुद्ध सोन्याची होती. 19नगरीच्या तटबंदीचे पाये सर्व प्रकारच्या रत्नांनी मढविलेले होते: पहिला यास्फे, दुसरा नीलमणी, तिसरा अकीक, चौथा पाचू, 20पाचवा गोमेद, सहावा लाल कर्णेलियन, सातवा पीतमणी, आठवा वैडूर्य, नववा पुष्कराज, दहावा हरितमणी, अकरावा याकीथ, आणि बारावा कर्केतन. 21बारा वेशी बारा मोत्यांच्या होत्या, प्रत्येक वेस एकाच मोत्याची बनविलेली होती. नगरीचा रस्ता काचेसारख्या स्वच्छ शुद्ध सोन्याचा होता.
22नगरीत मला कोणतेही मंदिर दिसले नाही, कारण सर्वसमर्थ सार्वभौम पिता आणि येशू कोकरा हेच तिचे मंदिर आहे. 23नगरीवर प्रकाश पाडण्यासाठी तिला सूर्याची किंवा चंद्राची गरज नाही—आमच्या पित्याचे तेज तिला प्रकाशित करते, आणि येशू कोकरा हा तिचा दीप आहे. 24राष्ट्रे तिच्या प्रकाशात चालतील, आणि पृथ्वीचे राजे आपले वैभव तिच्यात आणतील. 25आणि तिच्या वेशी दिवसा कधीही बंद होणार नाहीत—आणि तेथे रात्र असणारच नाही. 26राष्ट्रांचे वैभव व सन्मान ते तिच्यात आणतील. 27कोणतीही अशुद्ध वस्तू तिच्यात कधीही प्रवेश करणार नाही, तसेच अमंगळ किंवा खोटे करणाराही नाही—केवळ येशू कोकऱ्याच्या जीवनाच्या पुस्तकात ज्यांची नावे लिहिलेली आहेत तेच प्रवेश करतील.