राजाच्या विवाहाचा दिवस
आपल्या प्रियकराला ती स्त्री अंधाऱ्या नगरात शोधते आणि पहारेकऱ्यांना विचारते. मग तो सापडतो, आणि त्याला आपल्या आईच्या घरी आणेपर्यंत ती त्याला सोडत नाही. त्यानंतर इतर आवाज शलमोनाची रक्षकांनी वेढलेली पालखी जवळ येताना पाहतात. विवाहाच्या दिवशी राजाच्या मस्तकावर मुकुट आहे.
3 1रात्रभर माझ्या अंथरुणावर मी माझ्या जिवाच्या प्रियकराचा शोध घेतला; मी त्याचा शोध घेतला, पण तो मला सापडला नाही. 2आता मी उठेन आणि नगरात फिरेन, रस्त्यांतून आणि चौकांतून; मी माझ्या जिवाच्या प्रियकराचा शोध घेईन. मी त्याचा शोध घेतला, पण तो मला सापडला नाही. 3नगराची राखण करत फिरणाऱ्या पहारेकऱ्यांना मी भेटले. “माझ्या जिवाच्या प्रियकराला तुम्ही पाहिले आहे का?” 4मी त्यांना ओलांडून पुढे गेले नाही तोच मला माझ्या जिवाचा प्रियकर सापडला. मी त्याला धरून ठेवले आणि जोपर्यंत मी त्याला माझ्या आईच्या घरी, जिने मला गर्भात धारण केले तिच्या खोलीत आणले नाही, तोपर्यंत मी त्याला जाऊ दिले नाही. 5यरुशलेमेच्या कन्यांनो, रानातील हरिणी व सांबरींची शपथ घालून मी तुम्हांला बजावते: जोपर्यंत प्रीतीची इच्छा होत नाही, तोपर्यंत तिला चाळवू नका किंवा जागवू नका.
6धुराच्या स्तंभांसारखी, गंधरस व ऊद यांनी सुगंधित झालेली, व्यापाऱ्याच्या सर्व सुवासिक चूर्णांनी दरवळणारी, रानातून वर येणारी ही कोण आहे? 7पाहा—ही शलमोनाची स्वतःची पालखी आहे, इस्राएलाच्या वीरांपैकी साठ वीर तिच्याभोवती आहेत, 8ते सर्व तलवारी धारण करणारे, युद्धात तरबेज आहेत, रात्रीच्या भयापासून रक्षण करण्यास प्रत्येकाची तलवार त्याच्या कमरेला आहे. 9शलमोन राजाने लबानोनाच्या लाकडापासून स्वतःसाठी पालखी बनवली. 10त्याने तिचे खांब रुप्याचे, तिची पाठ सोन्याची, तिचे आसन जांभळ्या रंगाचे बनवले; तिचा आतील भाग यरुशलेमेच्या कन्यांनी प्रेमाने जडवला. 11सीयोनेच्या कन्यांनो, बाहेर या आणि शलमोन राजाकडे न्याहाळून पाहा, त्याच्या विवाहाच्या दिवशी, ज्या दिवशी त्याचे हृदय आनंदित झाले, त्या दिवशी त्याच्या आईने त्याच्या मस्तकी घातलेला मुकुट परिधान केलेल्या राजाकडे पाहा.