आपण त्याच्या घरी जाऊ या
आरोहणाचे गीत. दाविदाचे.
आपल्या पित्याच्या घरी पोहोचल्याचा यात्रेकरूचा आनंद, त्याचे पाय खरोखरच वेशींच्या आत उभे आहेत. हे नगर असे आहे जेथे वंश एकत्र येतात आणि जेथे न्याय दिला जातो, म्हणून तो त्याच्या शांतीसाठी प्रार्थना करतो, आणि म्हणतो की तो हे स्वतःसाठी नव्हे तर आपल्या बांधवांसाठी करतो.
122 1जे मला म्हणाले, “आपण आमच्या पित्याच्या घरी जाऊ या,” त्यांच्याबरोबर मला आनंद झाला. 2हे यरुशलेमा, आमचे पाय तुझ्या वेशींमध्ये उभे आहेत. 3यरुशलेम, एकत्र दृढपणे जुळलेल्या शहरासारखे बांधलेले आहे, 4तेथे वंश चढून जातात, आमच्या पित्याचे वंश, इस्राएलासाठी नियम म्हणून, आमच्या पित्याच्या नावाचे उपकारस्तवन करण्यासाठी. 5कारण तेथे न्यायासाठी सिंहासने स्थापिली गेली, दाविदाच्या घराण्याची सिंहासने.
6यरुशलेमच्या शांतीसाठी प्रार्थना करा: “जे तुझ्यावर प्रेम करतात ते स्वस्थ राहोत. 7तुझ्या तटबंदीत शांती असो, तुझ्या राजमंदिरांत सुरक्षा असो.” 8माझे बंधू आणि माझे सोबती यांच्यासाठी मी म्हणेन, “तुझ्यामध्ये शांती असो.” 9आमच्या पित्याच्या घरासाठी मी तुझे हित शोधेन.